माझा प्रिय बाप...
थकलाय आता माझा बाप,
त्यालाही हवाय आधार
गेली चाळीस वर्ष घराचा भर वाहून,
खांदे झुकलेत त्याचे अलीकडे,
आपला परका न करता,
सगळ्यांना सोबत घेऊन, चालणारा
उपराच राहिला, कदाचित माझ्यासाठीही...
पण तरीही तो आशेन बघतो माझ्याकडे,
आपला पोरगा जबाबदारी घेईल,
त्याची नाही पण घराची अन स्वताच्या आईची, म्हणून
हळूच तो, तुझ्या आईला हवाय अस म्हणत,
स्वत:चीच स्वप्न लादत असतो माझ्यावर,
भाऊ-बंद्कीच्या खोट्या अन जहाल पाशात अडकलेल्या त्याला,
अलीकडे माझा आधार वाटू लागलाय,
कदाचित विश्वास असेल त्याचा,
आपल पोटच पोर आपल्यावर उलटणार नाही याचा.
स्वार्थ नावाचा शब्द विसरून गेलाय तो,
ज्यानं पिढी शिकवली त्याला वाचता येत नाही म्हणून नाही,
तर स्व कर्तुत्वाने विसरलाय तो...
मी हि थोडाफार शिकलोय त्याच्याकडूनच...
स्वार्थ, आपलेपणा, मी, माझा, आणि...
आणि शत्रूचहि मरण झेलण्याची वृत्ती...
तसा पूर्वीचा अभिमानी-स्वाभिमानी तो,
हल्ली नमत घेतो कधीतरी,
घर तुटेल,
आमचा अहंकार दुखावेल म्हणून,
आज बाबा एवढंच सांगेन,
तुमचा मुलगा होण्याच जे भाग्य मला मिळालाय ते माझ्यासाठी माझ्या
मुलानाही मिळाव इतक तरी सक्षम व्हायचंय मला. स्वार्थ आणि आपमतलबी पणाशिवाय चालणारी
दुनिया केव्हाच हरवली हो ओघात...
आयुष्यातील प्रत्येक श्वास,
तुमच्या शिकवणुकीवर जगेन,
प्रत्येक कर्म स्वार्थरहित करेन,
पाय काट्यावर पडला माझा तरीही चालेल,
पण येणाऱ्या प्रत्येकाला मिळावी वाट काट्यानविना,
म्हणून दूर करता आले तर करीनच ते,
नाहीच जमल तर झोपेन आडवा काटयावर,
अहो, शत्रुसुध्धा दिमाखान चालत आला पाहिजे,
हि तुमचीच तर शिकवण...
प्रत्येकान हा हिमालय घट्ट उभा राहताना बघितला आहे,
मी हि एक अविचल विचार अनुभवला आहे,
पण,
मला एकट्यालाच साक्षी ठेवून,
या हिमालयाला कोसळताना बघितलाय मी...
म्हणूनच विनवितो तुम्हाला बाबा,
जमल तर माफ करा तुमच्या या लेकाला,
तुमचे अश्रू नाही पुसता आले म्हणून,
तुम्हाला साथ नाही देता आली म्हणून,
तुमच्या वेदना नाही समजल्या म्हणून,
आणि जमल तर विश्वास ठेवा...
तुमचा मोडलेला स्वाभिमान पुनः उभा करेन मी,
फक्त माझ्यावर एकवार विश्वास ठेवून बघा...
तुमचा लेक...