Tuesday, April 16, 2013

                              एक स्वप्न

एक स्वप्न आहे मनी जपलेले,

क्षितिजाच्या पार नभी सजलेले,


झेपावले मन घेई गगन भरारी,

उरे आभाळ, सडा चंद्रिकेचा दारी,


दारी असे वृंदावन, तिची आईपरी माया,

हंबरते कामधेनु, झिजवुनी सारी काया,


मंद झुळूझुळू वाहे, संगे झऱ्याचे हे पाणी,

आहे अगम्य सुबोध, संगे संतांची वाणी,


पहाटेस सडा प्राजक्तीचा, फुले पारिजात अंगणी,

रोज रातीस मिलन, बहरते लाजरी रातराणी,


एकटाच होतो प्रिये, संगे दोन आसुसले मुके जीव,

त्यांची वेगळीच व्यथा आता सोबतीस तुझी छाया,


तू देता हात हाती, शब्द सारे उधळले,

लेवुनिया साज नवा रंग सारे बहरले,


दोन तुझ्या डोळ्यातले, स्वप्न वेडे जागलेले,

मी तुझ्या हृदय देशी, घर अपुले बांधलेले.

No comments:

Post a Comment